Kamshet : वसतिगृहात राहणा-या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; केअर टेकरसह संस्था चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – वसतिगृहात राहणा-या 13 वर्षीय मुलावर केअरटेकरने अनैसर्गिक अत्याचार केला. संस्था चालकाला याबाबत माहिती असूनही त्याने मुलाच्या पालकांना अथवा पोलिसांना न सांगता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याबाबत केअर टेकर आणि प्रभारी संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केअर टेकर रसूल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), प्रभारी संस्था चालक महम्मद अली खुरासानी (रा. कामशेत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलाच्या 50 वर्षीय आत्याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे वडील जानेवारी 2019 आणि आईचा मार्च 2012 मध्ये मृत्यू झाला. पीडित मुलाचा सांभाळ करण्यास कोणी नसल्याने त्याच्या आत्याने 14 जून 2019 रोजी मुलाला कामशेत येथील एका वसतिगृहात टाकले. वसतिगृहाची संस्था असल्याने शाळा आणि राहण्याची सोय झाली. मुलाची आत्या आणि त्यांचे नातेवाईक अधूनमधून मुलाला भेटायला येत असत. ऑक्टोबर 2019 मध्ये फिर्यादी महिलेचा नियोजित जावई पीडित मुलाला भेटायला गेला. त्यावेळी आरोपी खुरासानी याने त्यांना पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाला असून तो या वसतिगृहात येण्यापूर्वी हा प्रकार झाल्याचे सांगितले. इथे येण्यापूर्वी हा प्रकार झाला असल्याने याबाबत कोणाला काही न सांगण्याचेही खुरासानी याने सांगितले. मात्र, फिर्यादी यांच्या नियोजित जावयाने फिर्यादी यांच्या मुलीला आणि मुलीने फिर्यादींना सांगितले. ही बाब समजल्यानंतर फिर्यादींनी मुलाला मीरा रोड येथील घरी नेले.

घरी गेल्यानंतर काही दिवस पीडित मुलगा कोणाशीही जास्त बोलत नव्हता. एक महिना उलटल्यानंतर मुलगा हळूहळू घरात रुळला. त्यानंतर फिर्यादींनी त्याला विश्वासात घेऊन झाल्या प्रकाराबाबत विचारले असता मुलाने सांगितले की, ‘सप्टेंबर महिन्यात एके दिवशी आम्ही सर्वजण अभ्यास करीत होतो. माझे पुस्तक राहिले म्हणून मी पुस्तक आणण्यासाठी खोलीत गेलो. त्यावेळी रसूल याने पीडित मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबत फिर्यादींनी चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने ठाणे ग्रामीण मधील मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.