Pimpri News : अधिकारी, कर्मचा-यांसाठी महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयांत लसीकरण केंद्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाकी आहे. त्यात आरोग्य कर्मचा-यांची संख्या जास्त आहे. अनेक अधिकारी, कर्मचा-यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचा-यांच्या लसीकरणासाठी महापालिका मुख्यालय, आठही क्षेत्रीय कार्यालयांत लसीकरण केंद्र सुरु केले जाणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

राज्य शासनाने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांचे तातडीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महापालिका मुख्यालयामध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत सुचित केले आहे.  महापालिकेमार्फत यापूर्वी अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचे आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन अंतर्गत लसीकरणासाठी नोंदणी करुन लसीकरण प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

पंरतु, अद्यापही मोठ्या प्रमाणात महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांचे लसीकरण झाले नाही. यामध्ये आरोग्य सेवा कर्मचा-यांची संख्या जास्त आहे. तसेच ब-याच अधिकारी आणि कर्मचा-यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.

अधिकारी, कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कोरोना लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी क्षेत्रिय कार्यालयामध्ये आणि महापालिका मुख्य इमारतीमध्ये लसीकरण केंद्र कार्यान्वित  करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच लसीकरण केंद्रासाठी आवश्यक साहित्य, बैठक, पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. क्षेत्रिय कार्यालयामधील रुग्णालय विभागाच्या ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून लसीकरणासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे.

ज्यांचे लसीकरण राहिले आहे. अशा सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना लसीकरणाबाबत परिपत्रकाव्दारे माहिती द्यावी. वर्ग – 4 मधील कर्मचा-यांचे लसीकरणाबाबत प्रबोधन करुन त्यांना कोरोना लस घेण्यासाठी तयार करावे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय यांनी क्षेत्रिय अधिकारी यांच्याशी लसीकरण सत्र आयोजनाबाबत समन्वय साधून लसीकरण सत्र आयोजित करावे. त्याचा अहवाल वैद्यकीय मुख्य कार्यालय येथे लसीकरणाच्या दिवशी पाठवावा, असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.