Vaccination News : एक मे रोजी राज्यात 18 ते 44 वयोगटातील 11,492 जणांनी घेतली लस

एमपीसी न्यूज – राज्यात एक मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शनिवारी 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

एक मेपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज (रविवार, दि.2) मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे तीन लाख डोसेस खरेदी केले आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढ साठ हजारांवर स्थिरावली आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने लस उत्पादक कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.