Vadgaon Maval : शासनाचे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांना मिळण्यासाठी भाजपचे वडगावमध्ये आंदोलन

एमपीसी न्यूज – विविध कार्यकारी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणा-या शेतक-यांना शासनाकडून 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तशी शासनाने घोषणा देखील केली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतक-यांच्या बँक खात्यावर अजूनही ही रक्कम जमा केली जात नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 20) वडगाव मावळ येथे आंदोलन केले जाणार आहे. 

याबाबत भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर, कार्याध्यक्ष विकास शेलार, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, राजाराम असवले,किसन सावळे, किसन येवले, हरिभाऊ दळवी, संतोष काळे, किसन अंबोले,संतोष येवले आदींनी नायब तहसीलदाररावसाहेब चाटे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत सरकारने देण्याचे जाहीर केले होते. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व नाराजी असून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड नियमित व वेळेत करून चूक तर केली नाही ना कर्जाची परत फेड करावी की नाही अशी मनस्थिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून किसान मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.