Vadgaon News : स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग तपासणी बंद करण्याचा संकल्प करा : रुपाली चाकणकर

एमपीसीन्यूज : वंशाला दिवा हवा म्हणून आजही स्त्रीभ्रूण हत्या होतेय ही मोठी शोकांतिका असून ती रोखायची असेल तर गर्भलिंग तपासणी बंद करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करा , असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वडगाव मावळ येथे बोलताना केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून व मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये गुरुवारी (दि.22) कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांच्या सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी आमदार सुनील शेळके, प्रदेश निरीक्षक भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, विठ्ठल शिंदे, बाबुराव वायकर, गणेश खांडगे, सुभाष जाधव, दीपक हुलावळे, सचिन घोटकुले, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, उपनगराध्यक्षा पूजा वहिले, रुपाली दाभाडे, शोभा कदम, वैशाली दाभाडे, माया भेगडे, सुनीता काळोखे, मंजुश्री वाघ, शीतल हगवणे, मीनाक्षी ढोरे, सुनील दाभाडे, नारायण ठाकर, नामदेव शेलार, कैलास गायकवाड, सुनील भोंगाडे, अतुल राऊत, नवनाथ चोपडे आदी उपस्थित होते.

चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी प्रभावी विरोधीपक्षनेते म्हणून कायम राहावे, अशी शुभेच्छा दिल्या. दुसऱ्याने केलेल्या कामावर रेघोट्या ओढून श्रेय घेणे त्यांनी बंद करावे असा इशारा देत, फडणवीस व त्यांची टीम महाराष्ट्राचे खच्चीकरण करत असल्याचा आरोपही चाकणकर यांनी केला.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने राज्यात आजपासून सुप्रिया स्वाधार अभियान राबविले जाणार असून कोरोनामुळे निराधार झालेल्या राज्यातील सुमारे 13 हजार महिलांना आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत हे अभियान पूर्ण करण्यात येणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

यावेळी कोरोना संकटात काम केलेल्या तालुक्यातील डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलीसपाटील आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह व साडी देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

स्वागत अर्चना घारे यांनी तर प्रास्ताविक सुवर्णा राऊत यांनी केले. सूत्रसंचालन अतुल राऊत व विनया केसकर यांनी केले तर आभार वैशाली दाभाडे यांनी मानले.

“कोरोना सारख्या भीषण संकटात मावळ तालुक्यातील डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलीसपाटील अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजून उपमुख्यमंत्री पवार यांच्या जन्मदिनी या महिला भगिनींच्या सन्मानाचे आयोजन केले असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.”

“मावळ तालुक्यातील महिला भगिनींनी आमदार शेळके यांना आमदार करण्यासाठी मोलाची साथ दिली होती. त्याच महिला भगिनींनी वर्षभराच्या कोरोना संकटातही मोलाची साथ दिली व आताही प्रत्येक तालुक्यातील महिलांची प्रत्येक निर्णयाला साथ मिळत असल्याचे मत कुलस्वामिनी मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांनी व्यक्त केले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.