Wakad : फ्लॅट घेण्यासाठी 32 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना 1 ऑक्टोबर 2017 ते 11 जानेवारी 2018 या कालावधीत घडली. हा गुन्हा वाकड पोलिसांकडून शिवाजीनगर पोलिसांकडे व नंतर शिवाजी नगर पोलिसांकडून वाकड पोलिसांकडे वर्ग करून शनिवारी (दि. 2) दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक अरविंद दळवी (वय 30), सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक आणि फिर्यादी महिला हे दोघे विमाननगर येथील एका कंपनीमध्ये कामाला होते. कंपनीत त्यांची ओळख झाली. ओळख वाढून त्याचे मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. महिलेच्या आई-वडिलांच्या संमतीने आरोपी आणि फिर्यादी यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. फिर्यादी यांच्या वडिलांनी स्त्रीधन म्हणून एक तोळे सोने दिले. तसेच इतर वस्तू दिल्या. लग्नानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी फिर्यादी यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 32 लाख रुपये आणण्याची मागणी केली. हे पैसे आणण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपी पती, सासू आणि सासरे यांनी मिळून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

याबाबा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरुवातीला हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास असल्याने गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर फिर्यादी महिला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने हा गुन्हा पुन्हा वाकड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.