Wakad : डिलिव्हरी बॉयला अडवून सिगारेट चोरणा-या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून 1 लाख 15 हजार 844 रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेणा-या पाच चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका लाख 35 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय 20), ओंकार उर्फ बाबू नंदकुमार वैराट (वय 19), अँथोनी डॅनियल अरकस्वामी (वय 20), राहुल प्रदीप शिंदे (वय 24, सर्व रा. घरकुल, चिखली), विकास पोपट वायकर (वय 21, रा. च-होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोशन रमेश वाधवानी (वय 39, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाधवानी हे व्यापारी आहेत. त्यांचे शगुन चौकात बॉम्बे स्टोअर्स नावाचे दुकान आहे. आशिष हरले त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. आशिष 27 डिसेंबर रोजी सकाळी दुचाकीवरून सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी मारुंजी येथे जात होता. आरोपींनी त्याला थेरगाव येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आशिषला मारहाण करून त्याच्याकडील एक लाख 15 हजार 844 रुपये किमतीची सिगारेटची बॅग हिसकावून घेतली आणि पोबारा केला. फिर्यादी वाधवानी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून आल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी आरोपींचा माग काढत रोझवूड हॉटेल थेरगाव, बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड जकातनाका, बिजलीनगर पाण्याची टाकी, खंडोबा माळ चौक, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर मार्गे चिखली या मार्गावरील ठिकठिकाणचे सुमारे 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून चिखली परिसरात सापळा रचून पाच चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल आणि सिगारेट असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.