Wakad: चक्कर आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वाराला लुटले; तरुणाला अटक

Wakad Robbed a two-wheeler rider parked on the side of the road due to dizziness; The youth was arrested कुणाल हॉटेलजवळ आले असता त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थोडा वेळ फूटपाथवर बसले.

एमपीसी न्यूज- चक्कर आल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला एकाने मारहाण करून लुटले. ही घटना 29 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील कुणाल हॉटेलजवळ येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

साहिल उर्फ पोट्ट्या दीपक सूर्यवंशी (वय 18, रा. रहाटणी फाटा, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल बाबासाहेब कुंभार (वय 32, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी. मूळ रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) यांनी शनिवारी (दि. 6) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी फिर्यादी राहुल त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 एफडब्ल्यू 3056) काळेवाडी येथून जात होते.

कुणाल हॉटेलजवळ आले असता त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थोडा वेळ फूटपाथवर बसले.

त्यावेळी तिथे आरोपी साहिल आला. त्याने राहुल यांच्या पोटात लाथ मारली. राहून यांनी साहिल याला विरोध केला असता साहिल याने राहुल यांना हाताने मारहाण करत 70 हजारांची होंडा शाईन दुचाकी, पाच हजारांचा मोबाईल फोन आणि साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 81 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

यातील आरोपी साहिल याला वाकड पोलिसांनी अटक केली. आठ दिवसानंतर राहुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.