Tahtwade News : रस्त्यांवरील विद्युत कामे करणार; सव्वातीन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – ताथवडे आणि वाकड येथील एकाच प्रभागातील विकसित केलेल्या विकास आराखड्यातील रस्त्यांवर विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. एकाच प्रभागातील कामांसाठी दोन वेगवेगळ्या निविदा मागविण्यात येऊन एकाच ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च होणार आहे.

ताथवडे आणि वाकड (प्रभाग क्रमांक 25) येथे विकास आराखड्यातील रस्ते नव्याने विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने प्रकाशव्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच इतर विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. ताथवडे आणि वाकड येथील कामांसाठी महापालिकेमार्फत दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविल्या.

ताथवडेतील कामासाठी दोन कोटी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित धरला. त्यानुसार ‘एस. टी. इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी एक कोटी 57 लाख रुपये दर सादर केला. निविदादरापेक्षा हा दर 22.50 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे ही निविदा स्वीकृत करण्यात आली आहे.

वाकड येथील रस्त्यावरील विद्युतविषयक कामांसाठी दोन कोटी 17 लाख रुपये खर्च अपेक्षित धरला. त्यानुसार ‘एस. टी. इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ याच ठेकेदाराने निविदादरापेक्षा 23.40 टक्क्यांनी कमी म्हणजेच एक कोटी 66 लाख रुपये दर सादर केला. त्यामुळे ही निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. ताथवडे व वाकड येथील या स्वतंत्र कामांसाठी एकूण तीन कोटी 24 लाख 81 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.