Pune News: पुण्यात कुलूपबंद घरात सापडला महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं

एमपीसी न्यूज: पुण्याच्या लोहगाव परिसरातील एका कुलूपबंद घरात महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनीता सूर्यवंशी (वय 39) असे मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासात या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु नेमका प्रकार अद्याप उघड झालेला नाही. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनिता या लोहगाव परिसरात पती आणि दोन मुलींसह वास्तव्यास होत्या. लोहगाव परिसरातच त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी पती आणि मुली भाजीविक्रीसाठी गेले होते तर सुनीता एकट्याच घरी होत्या.

दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुनीता यांचे पती आणि मुली घरी आल्या असता घराला कुलूप होते. त्यांनी सुनीता यांना फोन लावला असता बंद होता. फोन बंद असल्याने सुनीता बाहेर गेल्या असतील असे समजून त्यांनी काही वेळ वाट पाहिली. पण, सुनीता या आल्या नाहीत. तसेच त्यांचा फोन देखील बंद लागत होता. शेवटी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत जाऊन पाहिले असता त्यांना बाथरूममध्ये सुनीता यांचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता यांच्या गळ्यावर व्रण आढळून आले आहेत. त्यांचा गळादाबून खून केल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीबाबत अद्याप तरी माहिती समजू शकलेली नाही. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.