Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर (Talegaon) शनिवारी (दि. 13) सायंकाळी महिलांनी मोर्चा काढला. साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. भर दिवसा किशोर आवारे यांच्यासारख्या व्यक्तीची हत्या होत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना कोणतेही मुभा देऊ नये. आरोपींना कठोर शासन करावे. ज्यांची ज्यांना अटक करणे बाकी आहे, त्या सर्व आरोपींना अटक करावी अशीही मागणी महिलांनी केली.

Congress : कर्नाटक विजयाचा पिंपरीत जल्लोष

घटना घडल्यापासून पोलीस सातत्याने काम करीत आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेगळे पथक तयार केले आहे. आयुक्तालयातील चांगल्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी केले.

उपस्थित महिलांशी (Talegaon) सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी संवाद साधला. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष हत्या करणारे चार आरोपी, तर त्यांना सहकार्य करणाऱ्या एका आरोपीचा समावेश आहे. त्यांच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. तपास करून पोलीस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. पोलीस निपक्षपातीपणे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.