Dehuroad News : लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावरील उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली आहे. पुलाच्या कामासाठी देहूरोड सवाना चौकातून निगडीकडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावर वाहनांची गर्दी होत आहे.  पुलावर पावसाचे पाणी साचते. प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लोहमार्गावरील उड्डाण पुलाची एकूण लांबी 50  मीटर तर, उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी 12.5 मीटर आहे. पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून संथगतीने सुरु आहे.  लोहमार्ग उड्डाणपुलाच्या रखडलेल्या  कामांबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांसह  23 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक घेतली होती.  त्यानंतर अधिका-यांनी दिलेल्या मुदतीत पुलाचे काम सुरू न केल्याने आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर एमएसआरडीसीने काम सुरु केले होते.

पुलाचे काम 31 मे पर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, रेल्वेची परवानगी, लॉकडाऊनमुळे विलंब झाला. लॉकडाउनमध्ये काम करताना विविध अडचणी आल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जाते. पुलाच्या कामासाठी 28 जून पासून सवाना चौकातून निगडीकडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावर वाहनांची गर्दी होत आहे. मागील आठ दिवसांपासून धुवांधार पाऊस पडत आहे. पुलावरील पाणी वाहून जात नाही. पाणी साचून राहत आहे. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे म्हणाले, “पुण्याच्या दिशेने येणा-या पुलाचे काम ब-यापैकी पूर्ण झाले आहे. पावसामुळे थोड्या अडचणी येत आहेत. पाऊस थांबला की कामाचा वेग वाढवून पूर्ण केले जाईल. मुंबईच्या दिशेने जाणा-या अॅप्रोचच्या कामासाठी वाहतूक वळविण्याला परवागनी मिळत नव्हती. आता परवानगी मिळाली आहे. काम चालू केले आहे. लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.