YCMH :  ‘ओसीटी’ मशीन खरेदीची चौकशी करा, आमदार अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल इंजिनिअर (YCMH) यांनी ठेकेदाराशी केलेल्या वाटाघाटीमुळे ओसीटी मशीन खरेदीत घोळ झाला असून ठेकेदाराने स्पेसिफिकेशन बदलून मशीनचा पुरवठा केलाचा आरोप करत मशीन खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास सचिव यांना पत्र देत ओसीटी मशीन खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे. आमदार बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या भांडार विभागाने वायसीएम रुग्णालयातील पीजीआय नेत्र विभागाच्या मागणीनुसार ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली होती.

भांडार विभागाने जेम पोर्टलवर सुमारे 90 लाख रुपयाचे मशीन खरेदीस Gem/2022/B/2133845 निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार आद्या प्रॉपर्टीज आणि आर्थरॉन टेक्नॉलॉजीज हे दोन ठेकेदार पात्र ठरले. L1 आद्या प्रॉपर्टीज ठेकेदाराने 55 लाख 88 हजार दराने Horvitz Ltd,(YCMH) या कोरियन कंपनीचे तर L2 आर्थरॉन टेक्नॉलॉजीज आणि एंटरप्राइजेस ठेकेदाराने 63 लाख रुपये दराने Zeiss, या जर्मन कंपनीचे मशीन दिले जाणार होते.

Pune News : पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

महापालिकेच्या भांडार विभागाने ‘ओसीटी’ मशीन खरेदीसाठी 15U (मायक्रॉन) रिझोल्यूशनपेक्षा अधिक चांगले स्पेसिफिकेशन मागितले होते. मात्र, संबंधित आद्या प्रॉपर्टीज ठेकेदाराने 20U (मायक्रॉन) रिझोल्यूशनचे मशीन दिले आहे. त्यामुळे ठेकेदाराने दिलेले ‘ओसीटी’ मशीन उपकरणाचे स्पेसिफिकेशन आणि महापालिका स्पेसिफिकेशन यामध्ये खुपच तफावत आढळून आले आहे. याबाबत बॉयोमेडीकल इंजिनिअर आणि डॉक्टरच्या टीमने ‘ओसीटी’ मशीन स्पेसिफिकेशनमध्ये तफावत असतानाही ठेकेदाराशी अर्थपूर्ण संबंधाने समाधानकारक अहवाल दिला आहे.

दरम्यान, वायसीएमच्या नेत्र विभागात ओसीटी मशीनने रुग्णाच्या डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. ‘ओसीटी’ मशीन खरेदीत महापालिकेने दिलेले स्पेसिफिकेशन आणि ठेकेदाराचे स्पेसिफिकेशनमध्ये खूपच तफावत आहे. या मशीन खरेदीत गैरव्यवहार झालेला असून वायसीएम अधिष्ठाता,(YCMH) बॉयोमेडिकल इंजिनिअर, भांडार उपायुक्त यांच्या संगनमताने ठेकेदारास मदत करण्यात येत आहे. त्यामुळे सदर मशीन खरेदीत घोटाळा झाला असून त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणा-या अधिका-यावर कडक कारवाई करावी, सदरील ठेकेदाराचा पुरवठा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.