Sangvi : विदेशात नोकरीचे आमिष दाखवून दोन तरुणांची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट जॉब ऑफर लेटर, व्हिसा आणि विमानाचे तिकीट पाठविले. जॉब ऑफर लेटर हाती आल्याने तरुणांची जमीन आकाश एक झाले. परंतु नोकरी सुरु होण्यापूर्वी होणा-या प्रोसेससाठी पैसे लागत असल्याचे सांगत दोन तरुणांकडून 2 लाख 15 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जुलै ते 18 ऑगस्ट 2018 दरम्यान जूनी सांगवी येथे घडला.

विजयकुमार नामदेव बिरादार (वय 25, रा. कृष्णाई बिल्डिंग, ढोरेनगर, जुनी सांगवी) या तरुणाने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र वसंत पाटील (रा. बनास क्रांती टेम्पल, मराठा गल्ली, ता. गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याला विदेशात नोकरी हवी आहे. 14 जुलै रोजी त्याला रवींद्र याचा मेल आला. त्या मेलमध्ये मलेशियामधील  ITW Meritex sdn.BHD या कंपनीत त्याला जॉब ऑफर करण्यात आला होता. त्याबाबतचे बनावट जॉब ऑफर लेटर, बनावट व्हिसा आणि मलिंदा एअर या विमान कंपनीचे विमान प्रवासाचे बनावट तिकीट आले होते. रवींद्र आपल्याला विदेशात नोकरी लावणार, यावर विजयकुमारचा विश्वास बसला.

रवींद्र याने विजयकुमार सोबत आणखी एका मित्राला जॉब देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विजयकुमारने त्याचा मित्र राहुल धम्मूनसरे याला ही बाब सांगितली. राहुल देखील यासाठी तयार झाला. रवींद्र याने जॉब सुरु होण्यापर्यंत होणारा खर्च किंवा प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकी 1 लाख 7 हजार 500 रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी देखील विजयकुमार आणि राहुल दोघे तयार झाले. दोघांनी मिळून 2 लाख 15 हजार रुपये नेट बँकिंग आणि फोन पे द्वारे भरले. पैसे भरल्यानंतर रवींद्र सोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजयकुमारने पोलीस ठाणे गाठले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.