Pimpri : कामे अपूर्ण असताना मेट्रोची ट्रायल रनची घाई, डिसेंबर अखेर कशी धावणार मेट्रो ?

प्राधान्य मार्गावरही मेट्रो धावायला पुढील वर्ष उजाडणार

एमपीसी न्यूज – पुण्यातील नागरिक 2019 अखेर मेट्रोत बसून प्रवास करतील असा विश्‍वास गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांचे लक्ष मेट्रोकडे लागले होते. मात्र, सध्याचा कामाचा वेग आणि उर्वरित कामांचा आवाका पाहता पिंपरी ते दापोडी हा प्राधान्य मार्ग (प्रायोरिटी रूट) देखील पुढील दीड महिन्यात सुरू होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर मेट्रो धावणे अशक्य आहे.

पिंपरी-चिंचवडमधील प्रायोरिटी रूटवरील मेट्रो मार्गिका आणि स्टेशन यांचे सरासरी 70 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचे मेट्रोतर्फे सांगण्यात आले. डिसेंबर 2019 अखेर या मार्गावरील शंभर टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित असताना मेट्रोला ही डेडलाईन गाठणे शक्य झालेले नाही.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) 31 डिसेंबरपर्यंत 12 किमी मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले होते. पुणेकरांना 2019 मध्ये मेट्रोत बसता येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यानंतर महामेट्रोने पिंपरी ते दापोडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेज या अनुक्रमे सात आणि पाच किमीच्या दरम्यानच्या मार्गिकेची निवड प्राधान्यमार्ग (प्रायोरिटी रूट) म्हणून केली.

नोव्हेंबर संपत आला तरी पिंपरी ते दापोडी प्राधान्य मार्गांवर सरासरी 70 टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. पुढील दीड महिन्यात प्रामुख्याने मेट्रोसाठीचे सर्व बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती हेमंत सोनवणे यांनी दिली.

पिंपरी ते दापोडी मार्गावर नाशिक फाटा चौकातील काम पूर्ण होणे बाकी आहे. पुढील महिन्याभरात येथील कामे पूर्ण केली जाणार आहेत. या कामांसोबतच मार्गिकेवर रूळ टाकण्याचे आणि विद्युतवाहिन्यांसाठी खांब बसविण्याची कामेही सुरू आहेत. अद्याप सिग्नलिंगची कामे सुरू होणे बाकी आहे. या सर्व कामांची पूर्तता होणे आहे. तरीही मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी (ट्रायल रन) घेण्याची घाई मेट्रोने सुरु केली आहे.

पिंपरी ते दापोडी प्राधान्य मार्ग दृष्टीक्षेपात
मार्ग- 7.7 किमी
पाईल कॅप 464 पैकी 355 पुर्ण
सेगमेंट 3946 पैकी 2044 पुर्ण
स्पॅन जोडणी 426 पैकी 168

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.