Pimpri news: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी 1559 आरोग्य कर्मचारी, 103 पर्यवेक्षक

भत्त्यापोटी 62 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम पिंपरी – चिंचवड शहरातही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी आशा स्वंयसेविका आणि अंगणवाडी सेविकांसह महापालिकेचे 1559 आरोग्य कर्मचारी आणि 103 पर्यवेक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रति दिन 150 रूपये भत्ता देण्यात येत आहे. त्यासाठी 62 लाख 32 हजार रूपये खर्च होणार आहे.

कोरोना प्रादूर्भावावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोरोना रूग्ण शोधणे तसेच मधुमेह, हदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या आजाराच्या व्यक्ती शोधून काढण्यात येणार आहेत. याशिवाय बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही या मोहिमेत अंतर्भाव करण्यात आला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने पहिल्या फेरीत ही मोहिम 15 संप्टेबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली. तर, दुस-या फेरीत 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली.

शहराची लोकसंख्या सुमारे 24 लाख 76 हजार एवढी आहे. पल्स पोलीओ नकाशानुसार अंदाजे 8 लाख 18 हजार 628 घरे आहेत. त्यानुसार, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पहिल्या फेरीतील 15 दिवसांमध्ये दैनंदीन 54 हजार 575 घरांना भेटी देणे आवश्यक आहे. दैनंदीन एका पथकाने 35 घरभेटी याप्रमाणे एकूण 1 हजार 559 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, वॉर्डनिहाय एक स्थानिक नागरिक त्यामध्ये एक पुरूष आणि एक महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश राहणार आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसह महापालिकेच्या 1 हजार 559 आरोग्य कर्मचा-यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच या पथकांच्या पर्यवेक्षणासाठी 15 टीममागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिदिन 150 रूपये भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली. 1 हजार 559 आरोग्य कर्मचारी आणि 103 पर्यवेक्षक यांना प्रति दिन 150 रूपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या आणि दुस-या फेरीसाठी या भत्त्यापोटी 62 लाख 32 हजार रूपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.