Entertainment News : Scam 1992 ….. एक वास्तववादी चित्ररूपी गोष्ट  

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे): इतिहासातील काही गोष्टी ह्या प्रचंड रहस्याने भारलेल्या असतात , विशेषतः आपण एखाद्या गोष्टीचे त्या वेळी साक्षीदार असलो , त्या वेळची ती गोष्ट खर्‍या रूपात , आणि शोध पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून पुन्हा मांडल्यावर .आपल्याला त्या नव्याने उलगडतात , नुकत्याच हर्षद मेहेता वरील सोनी लिव वरील नव्याने आलेल्या 1992 Scam या वेब मालिकेचे ही तसेच आहे …

त्या वेळी आपण हर्षद मेहता या कोण्या इसमाने शेअर मध्ये करोडोंचा घोटाळा केला, इतकेच आपण ऐकून होतो , त्या विषयातल्या तज्ञ लोकांनाच तेवढे ठाऊक असावे की , नक्की घोटाळा काय आहे, बाकी आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहीतच नव्हते की, काय झाले होते?

त्यानंतर एक निश्चित असा काळ गेला, मधल्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या फायनान्शियल संपादिका  सुविख्यात पत्रकार, लेखिका सुचेता दलाल आणि पत्रकार देबाशीष बसू यांनी याच कालखंडावर “the scam, who won, who lost, who got away Mumbai” नावाचे विस्तृत पुस्तक लिहिले आणि प्रकाशित सुद्धा केले. सुचेता दलाल यांनीच पहिल्यांदा हे प्रकरण उजेडात आणले. हा घोटाळा उजेडात आणण्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष याची सुद्धा गोष्ट या मध्ये निश्चित आहे.

खरंतर सामान्य घरातून आलेल्या सर्वसामान्य जीवन जगणार्‍या तरुणांना झटपट श्रीमंत व्हायचे असतेच. त्या साठी प्रयत्नांची  पराकाष्ठा करण्याची तयारी असते. फक्त एक संधी हवी असते. या वेब मालिकेमध्ये हर्षद मेहताचा तो संघर्ष विशेषत्वाने दिसून येतो. जिथे जिथे प्रस्थापित लोकांशी कठोर संघर्ष करून नवोदितांना पुढे यायचे असते, तिथे कधी कधी तत्त्वांशी, कायद्याशी तडजोड करावीच लागते आणि तिथेच रिस्क असते आणि यातला हर्षद मेहता म्हणतो तसा

“रिस्क है तो ही इश्क है” हे ज्याच्या जीवनाचे ब्रीद वाक्य आहे, त्याच्याकडून व्यवस्थेमध्ये घोटाळा तर होणारच…

हे जरी असलं तरीही दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेली ही वेब सिरिज पाहताना आपल्याला या हर्षद मेहताविषयी एक सहानुभूती वाटायला लागते. व्यवस्थेने उगाचच बिचार्‍याला गुन्ह्यात गोवला, असेच वाटत राहाते.

अभिनेता प्रतीक गांधीने संयतपणे साकारलेल्या भूमिकेमुळे हर्षद मेहता आपल्यातलाच एक वाटायला लागतो आणि आपल्याशी नातंही सांगू पाहतो. हेमंत खेर यांनी साकारलेला अश्विन मेहता, जो की हर्षदचा भाऊ आहे आणि त्याचा बिझनेस पार्टनर आहे, त्याच्या त्यागाविषयी आणि भावाविषयी च्या प्रेमामुळे ममत्व वाटायला लागते.

अभिनेते रमाकांत दायमा यांनी निर्मळ मनाचा हर्षदचा पिता अत्यंत सहज सुंदर साकारला आहे. अभिनयाच्या पातळीवर सर्वांचीच कामे अत्यंत सुंदर, सहज आणि अत्यंत वास्तववादी झाली आहेत. दृश्यात्मक रचना इतकी सहज आहे की आपल्याला आपण सिनेमा अथवा वेबसिरीज वैगरे न पाहता आपणही त्या चाललेल्या गोष्टीचे भाग आहोत आणि आपल्यासमोर ही गोष्ट घडते आहे असेच वाटत राहते.

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक आणि रजत कपूर यांनी वेगळ्याच आणि परिणामकारक भूमिका साकारल्या आहेत. अनंत महादेवन यांनी ही आरबीआयचे गव्हर्नर म्हणून फारच सुंदर भूमिका साकारली आहे.

सुमित पुरोहित आणि कुणाल वाळवे यांनी याचे संकलन केले आहे तर याचे लेखन सुमित पुरोहित , सौरव डे, वैभव विशाल आणि करण व्यास यांनी केले आहे. संगीतकार अंचित ठक्करने याचे थीम म्युझिक फारच बहारदार केले आहे . याचे सह दिग्दर्शन जय मेहेता यांनी केले आहे.

एकूणच एक परिणामकारक आणि सध्याच्या इतर वेब मालिकांच्या पेक्षा काहीतरी वेगळे आणि वास्तववादी पाहायचे असेल तर सोनी लाईव्हवर असलेल्या या वेब मालिकेला पर्याय नाही. निश्चितच ही मालिका पाहायलाच हवी एवढे नक्की!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.