कौशल्य विकास योजनांतून देश प्रगतीपथावर – यशवंत मानखेडकर


जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारत हा रोजगाराभिमुख देश आहे, परंतु देशातील 40 टक्के कंपन्यांमध्ये तरुण कर्मचारी टिकत नाहीत. कारण आजच्या तरुणांमध्ये कष्ट करण्याची तयारी नाही. देशाचा तरुणवर्ग कुशल व तत्पर असेल तर देशाची प्रगती होते. कौशल्य विकास योजनांसारख्या उपक्रमांत जर तरुणांनी मोठया संख्येने सहभाग घेतला तर तरुणांची प्रगती होईल आणि तरुण पिढी प्रगत झाली तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे कौशल्य विकास योजनांना सर्वाधिक महत्त्व आहे, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याच्या युवा केंद्र कार्यक्रम सल्लागार समितीच्या रसिका कुलकर्णी, नेहरू युवा केंद्र पुणेचे मदन घेघाटे, संस्थेचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, प्राचार्य डॉ. दिपक भामरे, सुजाता सावंत, मेन्नुदिन कुमठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यशवंत मानखेडकर म्हणाले, भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. परंतु या वाढत्या तरुणाईमध्ये कष्ट करण्याची तयारी नाही, हे चित्र बदलले पाहिजे. याकरीता तरुणांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. इतर विकसित देशांप्रमाणेच भारतात देखील कष्टांच्या कामांना महत्त्व येणार आहे. आपल्यामध्ये विविध कौशल्ये असतील तर आपण स्पर्धेत टिकू शकतो. त्यामुळे कौशल्य विकास योजनांसाठी किती तरुण पुढे येतात हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

शार्दुल जाधवर म्हणाले, सध्याच्या वाढत्या स्पर्धेमुळे, स्पर्धेत टिकण्यासाठी पैसे द्यायचे आणि वेगवेगळ्या पदव्या मिळवायच्या, अशी परिस्थिती दिसते. तरुण वर्ग शिक्षित होत आहे, परंतु त्यांच्यातील अज्ञान देखील तितकेच दिसते. ही परिस्थिती बदलायची असेल तर तरुणांना कौशल्य विकास योजना, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे बेरोजगारी कमी होईल आणि बेरोजगारीमुळे होणा-या आत्महत्या देखील कमी होतील. सविता बिडकर यांनी सूत्रसंचालन केले. मदन घेघाटे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.