नोकिया 3310 चे नव्या रुपात रिलाँचिंग

एमपीसी न्यूज – नोकिया कंपनीने ‘रफ अॅण्ड टफ’ आणि लाँगलाईफ बॅटरी अशी खासियत असलेल्या नोकिया 3310 या मोबाईल हँडसेटला नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी रिलाँच केले आहे. सोबतच नोकिया 5, नोकिया 6, नोकिया 3 यांचीही नवे मॉडेल लाँच केले आहेत. स्पेनमधील बार्सिलोनात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले.

नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड, 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकणारी 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता आणि 1200 mAh क्षमतेची मोबाईल बॅटरी हे आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत.

तब्बल 17 वर्षांनंतर नोकिया 3310 नव्या स्वरूपात येत आहे. 2005 साली बंद झालेल्या या मोबाईलचे 12 कोटींपेक्षाही जास्त युनिट विकले गेले होते. स्मार्टफोनच्या युगात अनेकांना सेकंडरी फोन म्हणून फीचर फोनची आवश्यकता असते. नोकिया 3310 हा दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन आहे. त्यामुळे स्मार्टफोन युझर्स या फोनला सेकंडरी फोन म्हणून वापरतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.

एचएमडी ग्लोबल या फिनलँडच्या कंपनीने हा फोन लाँच केला आहे. नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नोकिया 6 हा फोन लाँच केला असून हा फोन अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.

नोकिया 3310 ची वैशिष्ट्ये

# नोकिया 3310 बद्दलच्या सर्व अफवा खऱ्या ठरल्या असून अनेक नवीन फीचर्ससह हा फोन बाजारात आला आहे.

# नोकिया 3310 युरोपमध्ये 3450 रुपयात उपलब्ध असेल. मात्र इतर ठिकाणची या फोनची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

# नवीन नोकिया 3310 मध्ये आता कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. 2.4 इंच आकाराच्या या डिस्प्लेमध्ये विविध प्रकारचे वॉलपेपर देण्यात आले आहेत.

# नोकिया 3310 च्या नव्या मॉडेलमध्ये कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रायमरी कॅमेऱ्याचा वापर करता येईल. मात्र यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही.

# तसेच नोकिया 3310 युझर्सची सर्वात आवडत्या स्नेक गेमचा या फोनमध्ये पुन्हा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मल्टीकलरमध्ये गेम या फोनमध्ये देण्यात आला आहे.

# जुन्या नोकिया 3310 प्रमाणेच या फोनमध्येही दमदार बॅटरी देण्यात आली आहे. 1200 mAh क्षमतेची ही बॅटरी 22 तासांचा टॉक टाईम बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.