Pune Crime News : मासेविक्री व्यावसायिकाची दुचाकीसह सात लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज : मासेविक्री व्यावसायिकाने  होलसेल व्यापा-याला देण्यासाठी आणलेली ७ लाखांची रोकड चोरट्याने दुचाकीसह चोरून नेली. ही घटना काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोथरूडमधील आनंदनगर चौकाजवळ घडली. याप्रकरणी अमोल परदेशी (वय ४४, रा. नानापेठ) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मासेविक्री व्यवसायिक असून नानापेठेत राहायला आहेत. काल सकाळी होलसेल व्यापा-याला रक्कम देण्यासाठी त्यांनी बँकेतून ७ लाखांची रोकड काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. अमोल मासेविक्रीच्या होलसेल व्यापा-याला  रोकड देण्यासाठी कोथरूडमधील सी फूड्स दुकानासमोर दुचाकी पार्क करून थांबले होते.

त्यानंतर चोरट्याने त्यांच्या दुचाकीला बनावट चावीने चोरून नेले. त्यामध्ये ७ लाखांची रोकड आणि ३० हजारांची दुचाकी मिळून  चोरट्याने ७ लाख ३० हजारांची चोरी केली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरु असल्याची माहिती सहायक  पोलीस निरीक्षक आर. ए. यादव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.