Pimpri : आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमांतून देशहिताचे काम करायचे आहे – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात मलिन झाली आहे. भाजपा सरकार हे 2 कोटी रोजगार मागील पाच वर्षात देणार होते. परंतु भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. विद्यमान खासदारांनी देखील मावळ मध्ये मागील पाच वर्षात एकही रोजगार आणला नाही. याउलट स्थानिक तरुण मागील पाच वर्षात बेरोजगार झाले आहेत. अशी अवस्था मावळ मतदारसंघाची झाली आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ हा बेरोजगारीमुक्त करण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार आहे. असे पार्थ पवार यांनी उरण मधील बैठकीत नागरिकांना आश्वासन दिले.

यावेळी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांसह महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.

“अनेक जाती धर्माचे लोक उरण परिसरात राहतात. त्यांनी सर्वांनी पुन्हा या देशात जातीभेद, धर्मभेद होऊ नये यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. सर्व स्तरातून पार्थ पवार यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. देशात महाआघाडीची सत्ता पुन्हा येण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाच्या माध्यमातून देशहितामध्ये सहभागी व्हावे”, असे आवाहन इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांनी केले.

पार्थ पवार म्हणाले, “आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमातून देशहिताचे काम करायचे आहे. देशासाठी आपलं प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे. महाराष्ट्रात सर्व जाती, धर्म आणि प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. हा एकोपा कायम ठेवण्यासाठी महाआघाडीला मतदान करणे गरजेचे आहे”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील म्हणाले, “भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास हवा आहे. मात्र भाजपा सरकारने केवळ जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशाचा योग्य तो विकास करण्यासाठी महाआघाडीला मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून भाजपा सरकारने देशाचा विकास होऊन दिला नाही. मात्र आता देशाला विकासित करण्यासाठी भाजपा सरकारला घरी पाठविण्याची वेळ आली आहे. मावळ मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आता मतदान करा” असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.