Ravet : ट्रकवर कार आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर
एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणारी स्विफ्टकार समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवारी) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर घडला.
निलेश हरिदास साळुंखे (वय 30, रा. नांदेड सिटी, पुणे. मूळ रा. कोंढार चिंचवली, ता. करमाळा, जि. सोलापूर), अभिषेक रवींद्र शर्मा (वय 24, रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (वय 28, रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुरज राजेंद्र मांजरे (वय 27, रा. दत्तनगर कॉलनी, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि जखमी सर्वजण एकाच कंपनीत काम करतात. ते त्यांच्या कामानिमित्त शनिवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजता कारमधून (एम एच 12 / इ एम 9974) बाहेर गेले होते. कुठे जात आहेत, याबाबत त्यांनी घरी सांगितले नाही. रविवारी (दि. 7) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर कार आली असता समोर रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकच्या (जी जे 31 / टी 2614) मागून कार ट्रकखाली गेली.