Pimpri : घरटी 60 रुपये कचरा शुल्कातून महापालिकेला वर्षाकाठी मिळणार 40 कोटी रुपये 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. यामुळे घरघुती करदात्यांना 720 रुपयांचा बोजा सहन करावा लागत आहे. जुलै महिन्यापासूनचे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. कचरा शुल्कातून वर्षाकाठी 40 कोटी रुपये जमा होतील असे महापालिकेला अपेक्षित आहे.

नगरविकास खात्याने महापालिकांना घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याबाबतचा अध्यादेश 11 जुलै 2019 रोजी केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी महासभेची स्वतंत्र मान्यता घेण्याची आवश्‍यकता नसल्याने महापालिकेने जुलैपासून प्रति घर दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. घरटी दरमहा 60 रुपये कचरा उपभोक्ता शुल्क आकारण्यात येत आहे. जुलै महिन्यापासून हे शुल्क वसूल केले जाणार आहे. यामुळे घरघुती करदात्यांना वर्षाला 720 रुपयांचा बोजा सहन करावा लागणार आहे. मालमत्ता कर अथवा पाणीपट्टीच्या बीलातून हे शुल्क वसूल केले जाणार आहे.  घरटी 60 रुपये कचरा शुल्कातून महापालिकेला वर्षाकाठी 40 कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पत्राद्वारे दिली आहे.

..असे आकारले जात आहे शुल्क !

प्रति घर दरमहा घरटी 60 रुपये, दुकानदार, दवाखाने यांच्याकडून 90 रुपये, शोरुम (उपकरणे, फर्निचर, ऑटोमोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स), गोदामे, उपहारगृहे व हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 160 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल, रुग्णालये 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 50 खाटांपेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 160 रुपये आणि 50 हून अधिक खाटा असलेल्या रुग्णालयासाठी 240 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक, धार्मिक संस्था, वसतीगृहे, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 120 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.