Pimpri: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायन्स पार्क, अभ्यासिका, उद्याने, वाचनालये बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क प्रेक्षकांकरिता बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या सहा अभ्यासिका, 16 वाचनालये बंद करण्यात आली आहेत. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली असून महापालिकेची उद्याने देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. शहरात तीन कोरोनाचे  पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 41 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. संशयामुळे अनेकजण स्वत:हून तपासणी करण्यासाठी महापालिका रुग्णालयात दाखल होत आहेत. जीवघेण्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

महापालिकेची निगडी, चिंचवड, भोसरी, संभाजीनगर, सांगवी आणि कासारवाडी अशा सहा अभ्यासिका आहेत. तर, शहरात विविध ठिकाणी 16 वाचनालये आहेत. कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका विचारात घेता महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारी ही सार्वजनिक वाचनालये, अभ्यासिका 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. या कालावधीत अभ्यासिका, वाचनालयामधील कर्मचा-यांनी क्षेत्रीय अधिका-यांच्या सुचनेनुसार काम करावे असे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क प्रेक्षकांकरिता बंद ठेवण्यात आले आहे.

महापालिकेची शहरात विविध 105 उद्याने आहेत. उद्यानांमध्ये नागरिक एकत्र येतात. महापालिकेने उद्यान परिसरात कोरोनापासून बचाव करण्याबाबतची जनजागृती केली आहे. ज्येष्ठ नागरिक संघनांदेखील पत्र पाठविले आहे. काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्याने देखील पुढील आदेशापर्यंत बंद केली आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.