Pune: बनावट हँड सॅनिटाइझर बनविणारे तिघे गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट दिवसेदिवस गंभीर होत असतानाच पुणे पोलिसांनी ‘बनावट हँड सॅनिटायझर’चे रॅकेट उघडकीस आणले आहे. बनावट हँड सॅनिटायझरचा कारखाना चालविणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून सुमारे एक लाख रुपये किमतीचे बनावट हँड सॅनिटायझर जप्त केले. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ धुण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा समावेश आवश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हँड सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा उठवीत जास्त पैसे कमविण्यासाठी बनावट हँड सॅनिटायझर बनवून विकणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 

अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी व सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे.

आरोपींनी घरातल्या घरात कारखाना तयार केला. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर शहरातील स्थानिक मार्केटमध्ये विकण्यात आले .

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .अशावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिक सॅनिटायझर आणि मास्क विकत घेत आहेत. याचाच फायदा घेण्यासाठी हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरामध्ये केली.

दरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरीकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाला 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटसअप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.