Beijing : चीनमध्ये ‘हंता’ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू ; 32 लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’

एमपीसी न्यूज – सर्व जगात कोरोनाचा कहर सुरु असतानाच चीनमध्ये आता ‘हंता’ व्हायरसने डोके वर काढले आहे. सोमवारी (दि.23) या विषाणूची लागन झाल्यामुळे युन्नान प्रांतातील एकाचा मुत्यू झाल्याचे समोर आले आहे. कामानिमित्त हा व्यक्ती शेडोंग प्रांतात परत जात असताना त्याचा मृत्यू झाला.

चार्टर्ड बसमधून प्रवास करणारा या व्यक्तीची हंता व्हायरसाठी केलेली चाचणी पॅाझिटीव्ह आली होती. या बसमधून प्रवास करणाऱ्या इतर 32 जणांची चाचणी घेण्यात आली. ती पॅाझिटीव्ह आली आहे. हंता व्हायरस हा असा विषाणू आहे जो सामान्यतः उंदरांना संक्रमित करतो, परंतु त्यामध्ये रोगराई उद्भवत नाही. उंदरांचे मूत्र, लाळ किंवा मल यांच्या संपर्कातून मानवांना हंता व्हायरसची लागण होऊ शकते.

या आजारामध्ये सुरुवातीला थकवा, ताप आणि स्नायूंच्या वेदना या लक्षणांचा समावेश आहे आणि या आजारामुळे मृत्यू होण्याचा दर 38 टक्के आहे. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेंशन च्या म्हणण्यानुसार, चिली आणि अर्जेंटिनामध्ये हंता व्हायरसच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कांमधून व्यक्ती-व्यक्तीचे संक्रमण होण्याची घटना दुर्मीळ आहे. थोडक्यात हा व्हायरस आणखी पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.