pimpri: राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका कर्मचार्‍यांचे दोन टप्प्यात वेतन

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या आदेशानुसारच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन दोन टप्प्यात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात श्रेणी ‘अ’ आणि ‘ब’च्या कर्मचार्‍यांना 50 टक्के, ‘क’ श्रेणी कर्मचा-यांचे 75 टक्के वेतन अदा केले जाणार आहे. पुढील वेतन सरकारच्या आदेशानुसार दिले जाणार आहे. तर ‘ड’ श्रेणीच्या कर्मचार्‍यांना शंभर टक्के वेतन देण्यात येणार आहे.

कोरोनाची पार्श्वभूमी, मार्च महिना आणि सध्या राज्यावर असलेले आर्थिक संकट याचा विचार करून राज्य शासनाने सरकारी कर्मचा-यांचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील समावेश आहे. त्याबाबतचा आदेश अर्थ खात्याकडून काढण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांचे देखील मार्च महिन्याचे वेतन राज्य सरकारच्या आदेशनुसारच केले जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेतील श्रेणी ‘अ’ व ‘ब’च्या कर्मचार्‍यांना 50 टक्के, ‘क’ श्रेणीतील कर्मचा-यांचे पहिल्या टप्प्यात 75 टक्के वेतन अदा केले जाणार आहे. तर, वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना शंभर टक्के वेतन दिले जाणार आहे. उर्वरित वेतन सरकारचा पुढील आदेश आल्यानंतर दिले जाणार आहे.

”राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका कर्मचा-यांचे दोन टप्प्यात वेतन अदा केले जाणार आहे. वेतन कशा पद्धतीने दिले जावे, याबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिल्यामुळे त्या पद्धतीने ‘सॉफ्टवेअर’मध्ये बदल केला आहे. मार्च महिन्याचे वेतन पुढील दोन दिवसात होईल”. मनोज लोणकर – सहाय्यक आयुक्त, प्रशासन विभाग.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.