Chikhali News: दहावीचे पेपर देण्यासाठी नातेवाईकांकडे थांबलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
एमपीसी न्यूज – दहावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान तिचे नातेवाईक गावी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मुलीला सांभाळण्यासाठी एका दाम्पत्याला सांगितले. त्यांनतर त्या दाम्पत्याचे भांडण होऊन पत्नी निघून गेल्यानंतर सांभाळ करणा-या पतीने अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विजय जगन्नाथ कांबळे (वय 35) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 38 वर्षीय आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 मार्च 2020 पासून एप्रिल 2020 च्या शेवटच्या आठवड्यादरम्यान रुपीनगर चिखली येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी तिच्या आत्याकडे राहत होती. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुलीची आत्या, त्यांचे पती आणि मुले सर्वजण गावी गेले. त्यावेळी पिडीत मुलीचा दहावीचा एक पेपर राहिला होता. त्यामुळे मुलीला गावी न नेता तिला आरोपीच्या घरी ठेवण्यात आले.
काही दिवसांनी आरोपी कांबळे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले. कांबळे याची पत्नी 14 मार्च रोजी माहेरी निघून गेली. त्यानंतर पिडीत मुलगी आणि आरोपी दोघेच घरात होते. तिच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
यामुळे मुलीने याबाबत कुणाला काही सांगितले नाही. मात्र मुलगी तब्बल 18 आठवड्यांची गर्भवती राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.