Sensational: सुशांतचा ‘लिव्ह लाईफ किंग साईज’ या तत्वावर विश्वास होता- रिया

पॅरिसमधील एका फॅशन शोसाठी मला आमंत्रण मिळालं होतं. त्यामुळे मला त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट दिलं होतं. पण सुशांतने माझं तिकीट रद्द केलं व स्वत:हून फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयच्या टीममार्फत अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. तिच्यामुळेच सुशांतचा मृत्यू झाला, ती त्याचा आर्थिक गैरफायदा घेत होती असे अनेक आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर केले आहेत. परिणामी तिच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे.

मात्र या टीकेला आता रिया देखील प्रत्युत्तर देत आहे. मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते, सुशांत स्वत:हूनच मला यूरोप ट्रिपवर घेऊन गेला होता, असं तिनं म्हटलं आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतसोबत केलेल्या यूरोप ट्रिपबाबत स्पष्टीकरण दिलं.

ती म्हणाली, ‘पॅरिसमधील एका फॅशन शोसाठी मला आमंत्रण मिळालं होतं. त्यामुळे मला त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट दिलं होतं. पण सुशांतने माझं तिकीट रद्द केलं व स्वत:हून फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं’.

‘तसंच त्यानेच यूरोप ट्रिपचं नियोजन देखील आखलं होतं. मला न सांगता सर्व पैसे त्याने स्वत:च भरले. मी सुशांतची प्रेयसी होते. त्यामुळे मी देखील यूरोप ट्रिपसाठी एका पायावर तयार झाले. सुशांतला एका सुपरस्टारसारखं जगायला आवडायचं. लिव्ह लाईफ किंग साईज या तत्वामध्ये त्याला विश्वास होता’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.