IPL 2020 : बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव करीत पंजाबने मिळवला मोसमातील दुसरा विजय

एमपीसी न्यूज – शारजा मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव केला. या मोसमातील पंजाबचा हा दुसरा विजय आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्त्युत्तरादाखल पंजाबने शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. कर्णधार के एल राहुल आणि ख्रिस गेल या दोघांनी अर्धशतकी खेळी करीत महत्त्वाची भूमिका बजावली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दिलेले 172 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने आज दमदार सुरुवात केली. कर्णधार के एल राहुलने आपला फॉर्म कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावले. राहुलने 49 चेंडूत एक चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 61 केल्या.

राहुलच्या सोबत सलामीला आलेल्या मयांक अगरवालने 25 चेंडूत चार चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा जमवल्या. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने देखील 45 चेंडूत एक चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी उचलली.

इतकी चांगली बॅटींग करुनही विजयासाठी पंजाबला अखेरच्या षटकात झगडावे लागले. निकोलस पुरनने एक चेंडूत एक धाव लागत असताना विजयी षटकार मारत पंजाबला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात देखील चांगली झाली. मात्र, त्यानंतर आरसीबीचा एक-एक फलंदाज ठराविक अंतराने तंबूत परतले.

देवदत पडिक्कल आणि फिंच या सलामीच्या जोडीने आरसीबीच्या संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी 38 धावांची भागीदारी केली. ल्यानंतर फिंच आणि कर्णधार कोहली यांची भागीदारी देखील फार काळ टिकली नाही.

आश्विनने फिंचचा त्रिफळा उडवत आरसीबीला आणखी एक धक्का दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला देखील बरी खेळी करता आली नाही. एबी डिव्हीलियर्स देखील स्वस्तात माघारी परतला.

शिवम दुबेने मैदानावर येऊन विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरला. संघाचा एकएक शिलेदार माघारी परतत असताना विराटने एक बाजू लावून धरली. विराटने सर्वाधिक 39 चेंडूत तीन चौकाराच्या मदतीने सर्वाधिक 48 धावा काढल्या.

अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत आरसीबीला 171 धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी दोन तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.