Pune Crime News : आंबेगाव बुद्रुक परिसरात जबरी चोरी, दहा लाखाचा ऐवज लंपास
एमपीसीन्यूज : शहरातील घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याची लक्षण दिसत नाहीत. बुधवारी एका दिवसात घरफोडीच्या तीन घटनांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका फळविक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून चोरट्यांनी तब्बल दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी किरण गायकवाड (वय 52) यांनी तक्रार दिली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण गायकवाड यांचा आंबेगाव पठार परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी घराला कुलूप लावून ते भारती विद्यापीठ परिसरात असणाऱ्या दुकानात गेले होते. हीच संधी साधून काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करतात बेडरूममधील कपाटातून तब्बल 9 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दरम्यान, संध्याकाळी फिर्यादी घरी परत आले असताना हा सर्व प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.