डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पाचवा स्मृतिदिन ; पुण्यात ‘निषेध जागर’

एमपीसी न्यूज- नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज, पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉमेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय यांनी तब्बल पाच वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. मात्र मास्टरमाइंड शोधण्यास तपास यंत्रणांना अजून यश आलेले नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिस ‘जवाब दो’ आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज दिवसभर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. आज सकाळी सव्वासात वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना जोशपूर्ण गीतांमधून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून जवाब दो रॅली काढण्यात आली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयापर्यत ही रॅली काढण्यात आली. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, सुभाष वारे, अजित अभ्यंकर, महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी, मेघा पानसरे, शैला दाभोलकर, अतुल पेठे, यांच्या सह अंनिस चे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले.

सकाळी 11 ते सव्वा बारा यावेळेत व्यर्थ न हो बलिदान यावर मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी या वक्त्यांची भाषणे होणार असून राज्यभरातून कार्यकर्ते या निषेध जागरात सहभागी होण्यासाठी येणार आहेत.

त्यानंतर सव्वा बारा वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या ‘भ्रम और निरास’ या हिंदी पुस्तकाचे लोकार्पण होणार आहे. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रा चंदा काशीद, प्रा गिरीश काशीद, प्रा. विजय शिंदे यांनी केला आहे. या लोकार्पण कार्यक्रमास रावसाहेब कसबे प्रमुख म्हणून उपस्थित असणार आहेत.

दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान ‘अभिव्यक्ती के खतरे’ या विषयावर बोलण्यासाठी प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते प्रकाश राज आणि दिग्दर्शक अमोल पालेकर उपस्थित असणार आहेत. साडेतीन ते साडेचार या वेळेत स्मिता पाटील कलापथक राष्ट्र सेवादल, इचलकरंजी प्रस्तुत एक अंकी नाटक ‘गांधींचं करायचं काय?’ सादर करण्यात येणार आहे.

पुण्यातील सिहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे आज दिवसभर सरकारला ‘जबाब दो’ डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. दरम्यान, पाच वर्षानंतर डॉ. दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात आले असले तरीही ‘मास्टरमाइंड’ कोण ? हा प्रश्न अजून देखील अनुत्तरीतच आहे. त्यामुळे सरकारला याचा जाब विचारण्यासाठी आज दिवसभर हा निषेधाचा जागर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.