Pune : 12 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ . पी . ए . इनामदार

4 ते 6 जानेवारी दरम्यान पुण्यात अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज- मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे 12 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 4 ते 6 जानेवारी दरम्यान पुणे येथे होणार असून स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.

आझम कॅम्पस (पुणे) येथे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या डॉ . शेख इकबाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . विलास सोनावणे यांच्या ठरावाला डॉ . बशरत अहमद यांनी अनुमोदन दिले .

महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली तरी त्यांची व्यवहाराची आणि अभिव्यक्त होण्याची भाषा मराठी आहे . मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी 28 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे . 23 वर्षांनी पुण्यात हे साहित्य संमेलन पुन्हा होण्याचा योग्य जुळून आला असून आझम कॅम्पस (पुणे कॅम्प )येथे हे साहित्य संमेलन होणार आहे . या चळवळीची साहित्य संमेलने सोलापूर , नागपूर , रत्नागिरी , नासिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत .

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ . शेख इकबाल मिन्ने, प्रा. लियाकत अली पटेल, अन्वर जावेद शेख , डॉ. बशरत अहमद , प्रा. आरिफ शेख, युनूस आलम सिद्दीकी, साजिद पठाण , ए के शेख, विलास सोनावणे, इम्तियाझ शेख, महमूद काझी, अब्दुल अझीम शेख , बशीर मिन्ने, कलीम अझीझ, दहार मुजावर, डॉ केतकी भोसले, अब्दुल लतीफ मगदूम,नूरजहाँ शेख, शहाजहान मगदूम, डॉ पांडुरंग कंद, कौसर मुजावर, आय के शेख यांचा समावेश आहे .

संमेलनात सहभागी होण्यासाठी मुस्लिम मराठी लेखक, कवी, गझलकार, कथाकार, नाटककारांनी ७०४०७९११३७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.