सामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी चिंचवडमध्ये दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांचे आयोजन

एमपीसी न्यूज – वेदनेचा डोंगर घेऊन जाणा-या दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संवेदनेचा हातभार लावण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 28) रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

इनरव्हील क्लब ही सामाजिक कार्यातील अग्रगण्य संस्था आहे. तर दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेने जळगाव आणि पुणे येथे भारतातील पहिले अपंग, अनाथ, आदिवासी व ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी निःशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. लोकसहभागातून भारतातील सुमारे 250 विद्यार्थी या प्रकल्पात आपल्या आयुष्याला आकार देत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला माणुसकीचा मदतीचा हात देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थी चकित करणारी गाणी, कविता, गोष्टी आणि अनुभव कथन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांची प्रकट मुलाखत देखील होणार आहे.

सामाजिक कार्याला सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका घेण्यासाठी अर्जुन दलाल (9881294890), रेखा मित्रगोत्री (9763714082), मंजुश्री कुलकर्णी (9850322678 / 9922004192), समीर आठल्ये (9881498294 / 020 – 24348004) यांच्याशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.