Maval : निवडणूक खर्चात पार्थ पवार आघाडीवर

राष्ट्रवादीचे पार्थ यांचा सव्वासात लाख तर शिवसेनेचे बारणे यांचा सव्वा लाख खर्च

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी खर्चात आघाडी घेतली. पार्थ यांनी प्रचारावर सात लाख वीस हजार 760 रुपये खर्च केला आहे. तर, भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी एक लाख 24 हजार 755 रुपये खर्च केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना तीन टप्प्यात केलेल्या खर्चाची माहिती द्यायची आहे. उमेदवारांना प्रचारासाठी 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. मावळातील उमेदवारांनी पहिल्या दोन टप्य्यातील खर्चाची माहिती सादर केली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील खर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी आघाडी घेतली आहे.

पहिल्या टप्यात पार्थ पवार यांनी आजवर चार लाख 23 हजार 853 रुपये तर दुस-या टप्प्यात दोन लाख 96 हजार 907 रुपये खर्च केला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पहिल्या टप्प्यात एक लाख 18 हजार 994 रुपये तर दुस-या टप्प्यात पाच हजार 761 रुपये खर्च केला आहे. सभा, मेळावे, रॅली पत्रके, वाहनांचे इंधन, झेंडे यावर दोन्ही उमेदवारांकडून हा खर्च करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांनी 54 हजार 684 रुपये प्रचारावर खर्च केला आहे. तर, बहुजन समाज पार्टीचे अॅड. संजय कानडे यांनी 32 हजार 223 रुपयांचा खर्च केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.