Kasarwadi : सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्या प्रकरणी ड्रेनेज ठेकेदार विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ड्रेनेजच्या कामासाठी खोलवर खोदकाम करत असताना शेजारी असलेल्या संरक्षक भिंतीला कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही. त्यामुळे भिंत कोसळून त्या भिंतीखाली अडकून एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनोज महिंद्रा ठाकूर (वय 32, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ठेकेदार संतोष हन्नु राठोड (रा. मोहननगर, चिंचवड), सुपरवायझर यशोधर गावित (रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील यशवंत सोसायटीजवळ ड्रेनेजचे काम सुरू होते. हे काम मागील दीड महिन्यापासून सुरू होते. यासाठी कामगारांनी खोलवर खोदकाम केले होते. दरम्यान शेजारी असलेल्या सोसायटीच्या संरक्षक भिंतीसाठी ठेकेदाराकडून कोणतीही संरक्षक उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये फिर्यादी यांचा चार वर्षाचा मुलगा तसेच ड्रेनेजचे काम करणारे मजूर शिवनारायण सोरेन व विष्‍णुदेव सोरेन (दोघे रा. पिंपरीगाव. मूळ रा. झारखंड) हे तिघेजण अडकले. यामध्ये फिर्यादी यांच्या मुलाचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.