Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, शेकडो दुकाने खाक

एमपीसी न्यूज : पुण्यातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या फॅशन स्ट्रीटला शुक्रवार (दि.२६) रात्री अचानक मोठी आग लागली. संपूर्ण मार्केट आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचण येत होती. मात्र, कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रय़त्न सुरु होते. दरम्यान या आगीत शेकडो दुकानांचे नुकसान झाले आहे.

आगीची तीव्रता मोठी असून, या दुर्घटनेत मार्केटचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांत ही आगीची दुसरी मोठी घटना आहे. शिवाजी मार्केटमधील मसळीबाजार जळून खाक झाला होता. त्यातच आता फॅशन स्ट्रीटला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीमही हाती घेतली होती. त्या विरोधात फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती.त्यामुळे ही कारवाई थंड बस्त्यात पडली होती.

बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे त्यात जिवित हानी झाली की, नाही याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.