Pune News : पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीवरील निखळला फरशीचा एक तुकडा

महापालिकेत राडा, महापौरांच्या कार्यालयावर शाई फेक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काल (दि.6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी या पुतळ्यावर बसवण्यात आलेल्या मेघडंबरीवरील फरशीचा एक तुकडा निखळला.

काम अपूर्ण असताना केवळ प्रसिद्धीसाठी या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला असूून कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर आज घोषणाबाजी केली.

दरम्यान, फरशीचा तुकडा महापालिकेचे कर्मचारी घेऊन जात असताना त्यांच्यासोबत या कार्यकर्त्यांची किरकोळ झटापटही झाली. हा पुतळा सध्या पडद्याआड झाकून ठेवण्यात आला आहे. क्रेनचा धक्का लागून फरशीचा तुकडा निखळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या नंतर महापालिकेमध्ये राडा झाला असून महापौर कार्यालयाच्या फलकावर काळी शाई फेकण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

महानगर पालिकेतील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग आज तुटल्याची घटना घडल्याने हा वादंग झाला. या पुतळ्याभोवती असलेलं डेकोरेशन खाली उतरवताना ही घटना घडली. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध करत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरील फलकावर शाई फेकली.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेने या पुतळ्याचं काम घाई-गडबडीत केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.