Pune News : रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे वसंत मोरे म्हणतात, अजून …

एमपीसी न्यूज – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरू झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे इनमिन दोन नगरसेवक असलेल्या मनसेला पुण्यात जोरदार धक्का बसला आहे, तेही राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वी पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसंच, ‘आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि ‘श्री.राज ठाकरे’ हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

मनसे, पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर एक ट्वीट केले आहे. वसंत मोरे आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, ‘ जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे. अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत.’ असे ट्वीट त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग केले आहे.

पुण्यात सध्या मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोन नगरसेवक आहेत. रुपाली पाटील-ठोंबरे या अक्रामक आणि सडेतोड भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचा मनसेला फायदा होत होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील दोन दिवस पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रुपाली पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी कडून अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.