Ycmh News : कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मानधन तत्वावरील कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षांपासून अखंडपणे सेवा करीत आहेत. त्यांना पालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करून घेण्याचा विषय प्रलंबित असताना पालिकेने आता वायसीएम मध्ये कायमस्वरूपी पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलून नवीन कायमस्वरूपी पदावरील भरती केल्यास आधीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल. कोविड काळात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

आमदार लांडगे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मानधन तत्वावरील कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षांपासून अखंडपणे सेवा करीत आहेत. कायमस्वरूपी स्टाफ आणि मानधनावरील स्टाफ यांचे कामाचे स्वरूप एकसारखेच आहे. तरीही मानधनावरील स्टाफला सोयी सुविधा कायमस्वरूपी स्टाफपेक्षा कमी आहेत. मानधनावरील कर्मचा-यांनी पालिका आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज दिले आहेत.

परंतु, या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. सहा महिन्यांपूर्वी मानधनावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी दिवाळी नंतर या कर्मचाऱ्यांना महापालिका आस्थापनेवर सामावून घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मानधन तत्त्वावर काम करणा-या कर्मचा-यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ठराव संमत झाला. महापालिकेकडून राज्य शासनाला फाईल पाठवली. त्या फाईलमध्ये काही त्रुटी असल्याने ती फाईल परत पालिकेकडे पाठवण्यात आली. ही फाईल तीन महिन्यांपूर्वी महापालिकेत आली आहे. मात्र, अद्याप त्या फाईलमधील त्रूटी पूर्ण केल्या गेल्या नाहीत. संबंधित फाईल पालिकेत असतानाही ‘सदर फाईल राज्य शासनाकडे आहे’ असे सांगण्यात येत आहे.

भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्या!

दरम्यान, आता महापालिकेने कायमस्वरूपी तत्वावर याच जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मानधनावरील कर्मचा-यांचा प्रश्न प्रलंबित असताना कायमस्वरूपी भरतीसाठी जाहिरात काढली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी कायमस्वरूपी कर्मचा-यांची भरती केल्यास अनेक वर्षांपासून मानधन तत्वावर काम करणा-या कर्मचा-यांवर अन्याय होईल. त्यामुळे हा विषय मार्गी लागेपर्यंत कायमस्वरूपी भरती थांबवावी आणि मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.