Mumbai News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अजित पवार यांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र

एमपीसी न्यूज – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पत्र मोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी, दि. 24) राष्ट्रपती महोदयांना आपल्या स्वाक्षरीचं पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली.

या उपक्रमांतर्गत मराठी भाषा विभागाच्या वतीने साडेदहा हजार पत्रे महामहिम राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात येणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने 2004 साली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. याला आता सात वर्ष उलटून गेली. साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणं गरजेचं आहे.

मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा,महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. ह्या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे शाबीत होते की, मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी कृपया मराठीला तो दर्जा दयावा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.