Alandi News : कार्तिक एकादशी उत्साहात, हरिनामाच्या गजरात अलंकापुरी दुमदुमली

एमपीसी न्यूज – जवळपास दोन वर्षापासून माऊलींच्या दर्शनासाठी आस लावून बसलेल्या वारक-यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक एकादशी निमित्त राज्याचा कानाकोपऱ्यातून लाखों भाविकांनी अलंकापुरीत हजेरी लावली आहे. आज (दि.30) कार्तिकी एकादशीचा मुख्य कार्यक्रम लाखों भाविकांच्या साक्षीने पार पडला. इंद्रायणी घाटावर वैष्णवांनी फुगडीचा फेरही धरला, तर काहींनी टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.

एकादशीच्या पहाटपूजेला प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, प्रांत विक्रांत चव्हाण,पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, नगरसेवक सचिन गिलबिले, नगरसेविका प्रतिमा गोगावले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मानकरी, आळंदी ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेच्या पहाट पूजेस भाविक, मानकरी, वारकरी, पदाधिकारी यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. पहाटे घंटानाद झाल्यानंतर दोनच्या सुमारास पवमान अभिषेक व 11 ब्रम्ह्वृंदांचे उपस्थितीत वेदमंत्र जयघोष प्रसाद जोशी यांचे पौरोहित्यात झाला. परंपरेने भीमा वाघमारे यांचे नियंत्रणात मंदिरात सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने भक्तिमय वातावरण निर्मिती केली . मंदिरात पहाट पूजे दरम्यान आकर्षक फुलांची सजावट पै. मानसिंग पाचुंदकर यांचे वतीने करण्यात आली. मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई तसेच परिसरात लक्षवेधी रंगावली रेखाटण्यात आल्या तसेच, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा 11 ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली.

एकादशी निमित्त माउली मंदिरात दुपारी फराळचा महानैवेद्य झाला. त्यानंतर पालखी नगरप्रदक्षीनेस दुपारी महाद्वारातून बाहेर निघाली. मंदिरातून नगर प्रदक्षिणेला नाम गजरात प्रदक्षिनामार्गे, हजेरी मारुती मंदिरात आरती, अभंग, हरिनाम गजर व प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्री’चा रथोत्सव बुधवारी (दि.01) गोपाळपुरातून निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.