Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही उमेदवार आघाडीचेच निवडून द्या, शास्तीकराचा प्रश्न सहा महिन्यात सोडवतो – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. शहरातील शास्तीकराचा प्रश्न सहा महिन्यात सोडवतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा काळेवाडी येथे पार पडला. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, शेख सुभान अली, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधीपक्ष नेते दत्ता साने शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना भाजपने प्रथम पाचशे चौरस फूट, नंतर एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या घरांचे शास्तीकर माफ केले. पण पिंपरी-चिंचवड 80 ते 85 टक्के लोकांची एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठी घरे आहेत. त्यांच्याबाबत हे सरकार काहीही बोलण्यास तयार नाही.

लोकशाहीमध्ये यश-अपयश असतच. मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता विजयची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लहान-लहान कार्यकर्त्यांना देखील मोठ्या संधी दिल्या. लोकसभेच्या वेळी पिंपरी-चिंचवड शहरात जे झालं, ते आता होऊ द्यायचं नाही. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले आहेत. त्यामुळे उमेदवार लवकरच निश्चित केले जातील. निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
अनेकांकडून तिकिटाची मागणी होत आहे. पण  पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणीही रुसायचं नाही, नाराज व्हायचं नाही. पक्षातून गेलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार नाही. त्यांच्याबाबत कुणीही निंदानालस्ती करायची नाही. पण पक्षातून गेलेल्या लोकांना परत पक्षात घेण्याचा आग्रह देखील जनतेने करू नये. असा विनोदी टोला देखील त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांना लगावला.
 महाराष्ट्रात काही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. तर काही उमेदवार उशिरा जाहीर करण्यात येणार आहेत. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार आहेत. आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे. नव्या जुन्याची सांगड घालत सर्वांना संधी दिली जाणार आहे. येत्या काळात आघाडीचेच सरकार येणार आहे, अशी खात्री देखील पवार यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.