Pimpri News : पदांचा लाभ मिळवण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जणार नाही – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही. पदांचा लाभ मिळवण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जाणार नाही. प्रसंगी हेकेखोरांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पक्षाविरोधात वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात नगरसेवक तक्रारी करत आहेत. दोनही आमदार महापालिकेत हस्तक्षेप करत आहेत. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करतात. त्यांनी अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यांच्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्याची तक्रार नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

त्यावर प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले की, भाजपा पक्षाविरोधात निराधार वक्तव्य करणाऱ्यांची पर्वा राज्यातील पक्षश्रेष्ठी करणार नाहीत. भाजपा हा पक्ष महत्त्वाचा आहे. काहीही झाले, तरी भाजपाची एकहाती सत्ता येणार आहे. पक्ष म्हणून सर्वांनी एकोप्याने काम करणे अपेक्षीत आहे. पण, कोणी पक्षाला आणि नेत्यांना आव्हान देवून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही.

भाजपामधील महत्त्वाच्या पदांचा लाभ न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेले काहीजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करीत आहेत. पक्षशिस्त महत्त्वाची आहे. सर्वांनी पक्ष आणि संघटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर मांडून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. निष्ठावंत म्हणून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी. निष्ठावंत भाजपाची कधीच बदनामी करणार नाहीत, असा असेही थोरात म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.