Talegaon Dabhade : उद्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे  कचरा प्रश्ना बाबत सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगर परिषदेच्या कचरा  व्यवस्थापनाच्या  गलथान कारभाराविरुद्ध उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजल्यापासून ,नगरपरिषद आवारामध्ये एक दिवसीय लाक्षणिक सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन होणार आहे.सर्व पक्षिय कृती समिती तळेगाव दाभाडे यांच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन केले आहे.

Vadgaon : मोरया महिला प्रतिष्ठानच्या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समितीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराबाबत यापूर्वी नगरपरिषद मुख्याधिकारी एन के पाटील यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला असताना ही कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक त्रुटी आढळल्या असल्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टर व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर विद्यमान मुख्याधिकारी एन के पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या मुख्याधिकारी एन के पाटील यांनी अनेक  सफाई कामगारांचे जीव धोक्यात घातलेले आहेत.

सफाई कामगारांचा गेल्या दहा महिन्यापासून पीएफ फंड, वैद्यकीय इएसआय वर्गणी भरलेली नसून शासकीय देणे न देता देखील तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कॉन्ट्रॅक्टरचे बिल अदा केले आहे हा सकृत दर्शनी गंभीर गुन्हा असून सदर तत्कालीन मुख्याधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे परंतु चौकशीचे कारण देत सर्व परिस्थिती माहिती असून देखील एन के पाटील, वेळ काढू पणा करत आहेत व सदर कॉन्ट्रॅक्टरला संधी देत आहेत, त्यामुळे ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे जनसेवा विकास समितीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सुमारे 18 महिन्यांपासून कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे सदर कॉन्ट्रॅक्ट करतेवेळी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी तांत्रिक मान्यता न घेतल्यामुळे महिना पाच लाख रुपये जनतेच्या कष्टाच्या व घामाच्या टॅक्स रुपी रकमेचे नुकसान झाले आहे तसेच सदर बिलिंग हे नफा फंडातून होत असल्यामुळे जनतेची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व सन्माननीय  मुख्यमंत्री यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

परंतु विद्यमान मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यासमोर सर्व बाबी पारदर्शक असताना देखील पीएफ फंड व वैद्यकीय इएसआय वर्गणी न भरणे हा अक्षम्य अपराध असून  देखील कारवाई देखील केली जात नाही.

जर एखाद्या सफाई कामगाराचा वैद्यकीय प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी विद्यमान मुख्याधिकारी एन के पाटील जबाबदार असतील. शासकीय देणे न देणे हा अपराध असून सदर कॉन्ट्रॅक्टर वर त्वरित गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.

तळेगाव मध्ये दुर्गंधीचे साम्राज्य असून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जागोजागी कचरा पडलेला आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीतील रस्त्यांचे खोदकामामुळे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात चिखल साठत असल्याचे सर्वत्र चित्र आहे.

कचऱ्याच्या घंटागाड्या कधीही वेळेवर येत नाहीत, आपल्या मनमर्जीप्रमाणे कचरा गोळा करणे हे महिला वर्गासाठी तसेच नोकरदार महिला वर्गासाठी अत्यंत त्रासदायक असल्याने प्रत्येक गल्लीगल्ली मध्ये कचरा विषयक अनेक तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात येत आहेत. ठेकेदाराकडून पुरवण्यात आलेल्या कामगारांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास आले होते.

सफाई कामगारांना पावसामध्ये कुठल्याही सुरक्षाविषयक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही, अनेक सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आजारी पडले असताना त्यांना शासकीय वैद्यकीय इएसआय सुविधेचा फायदा घेता आलेला नाही कारण ठेकेदाराकडून वैद्यकीय इएसआय वर्गणी भरली गेली नाही. सदर सर्व बाबी माहित असताना देखील नगर प्रशासनाचे अधिकारी टक्केवारीचे राजकारण करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

त्यामुळे घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कचरा कॉन्ट्रॅक्ट , व नगर प्रशासनाच्या कचरा मय मनोवृत्तीविषयी उद्रेक निर्माण झाला आहे सदर नागरिकांच्या सर्व समस्यांची शासन दरबारी दखल घेण्यात यावी यासाठी हे आंदोलन असून नागरिकांनी ही यात सहभागी व्हावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.