Talegaon Dabhade : ……आणि त्यांना बॅग परत मिळाली

राजेश शिरोडकरांनी सापडलेली मौल्यवान वस्तूंची बॅग केली परत !

एमपीसी न्यूज : माणुसकी संपत चालल्याची तक्रार असताना काही उदाहरणे अशीही सापडतात की मनाला धीर येतो! नाही, अजूनही माणुसकी जपणारी माणसे आहेत याची खात्री पटते. असेच एक उदाहरण नुकतेच घडले.

 डॉ. अनंत परांजपे व डॉ. सौ. अश्विनी परांजपे स्कूटरवरुन जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या रस्त्याने जात होते. रात्र अंधारी होती. धाकट्या पुलाजवळ डॉ. सौ. अश्विनी यांची हँडबॅग कुठेतरी पडली. त्यात पर्स, पैसे, गॉगल, घरगुती सामान अशा वस्तू होत्या. अंधारात लक्षात आले नाही.

 हि बॅग राजेश शंभू शिरोडकर यांना लक्ष्मीबाग कॉलनी जवळ शिरोडकरांना बॅग सापडली. मालक शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण नाव, पत्ता असा काहीच संदर्भ नव्हता. पण एक फोन नंबर होता. शिरोडकरांनी फोन लावला. तो होता ललिता व  लक्ष्मण निघूल यांचा. बॅग आपली नाही पण आजच आपण आपले कार्ड डॉ. अश्विनी परांजपे यांना दिल्याचे त्यांना आठवले. निघूल पती पत्नी शिरोडकरांच्या घरी गेले. पुढे सर्वजण डॉ. परांजपे यांच्या घरी गेले. खाणा खुणा पटल्या व बॅग परत मिळाली. एवढे सव्यापसव्य झाले पण बॅग अखेर ज्याची त्याला मिळाली. याचे कारण शिरोडकरांची प्रामाणिक वृत्ती!

डॉक्टर परांजपे दांपत्याने देऊ केलेले बक्षीस शिरोडकरांनी नाकारले. मी माझे कर्तव्य केले असे ते म्हणाले. अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत काम करणार्‍या राजेश शिरोडकर यांनी आजवर वेळोवेळी रस्त्यात ज्या वस्तू सापडल्या त्या शोध घेऊन मालकाला परत केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.