Pune News : अरविंद चांदोरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – लोकमान्य नगर भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद वासुदेव तथा बाळासाहेब चांदोरकर यांचे नुकतेच राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन अरविंद चांदोरकर यांना गौरविले होते. ते पिंपरीतील महिंद्रा ओवेन (सध्याची महिंद्रा इंजिनिअरिंग एण्ड केमिकल्स) या कंपनीमध्ये ‘सुपरवायझर’ पदावर कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी रिक्षाचालक म्हणून काम केले होते.

लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. शनिवार पेठेतील हनुमान व्यायाम मंडळाचे ते सक्रिय सदस्य होते. पानशेतच्या पुरामध्ये हनुमान व्यायाम मंडळाने राबविलेल्या मदतकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शनिवार पेठेत शिवजयंती उत्सवाचे आयोजन आणि प्रतापगडावरील ललिता पंचमी उत्सव यामध्ये ते पन्नासहून अधिक वर्षांपासून नियमितपणे सहभागी होत होते.

‘सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस’चे संस्थापक आणि पत्रकार आशिष चांदोरकर हे त्यांचे पुत्र होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.