Pimpri News : खंडीत वीज पुरवठ्याचा उद्योगाला फटका, पहिली पाळी कामाविना

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात आज (बुधवार, दि.09) सकाळी सहा वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागात साधारणतः पाच तासानं तर अनेक भागांत तब्बल दहा तासानंतर वीज पुरवठा  पूर्ववत झाला आहे. अनेक तास सलग वीज पुरवठा खंडीत राहिल्याने कॉर्पोरेट सेक्टर, ऑफिसेस आणि उद्योगांना मोठा फटका बसला आहे. औद्योगिक परिसरातील कंपन्यांची पहिली पाळी कामाविना गेल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेकांना सकाळी पाणी गरम करण्याचा हिटर पासून, मोबाईल, लॅपटॉपचे चार्जिंग ते मोठ मोठ्या सोसायटी मधील लिफ्टची समस्या निर्माण झाली. वीज खंडित झाला तेंव्हापासून शहरातील पाणी पुरवठा देखील विस्कळीत झाला.

पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरात असलेल्या उद्योगांना मात्र, खंडीत वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसला. सकाळी सहा वाजता पहिली पाळी सुरू होते त्याच वेळेला वीज पुरवठा खंडीत झाला आणि सायंकाळी चारच्या सुमारास तो पूर्ववत झाल्याने संपूर्ण पहिली पाळी कामाविना गेली. तसेच, आर्थिक नुकसान झाल्याने, उद्योजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ‘वीज पुरवठा किती काळ खंडीत राहील, याबाबत महापारेषणकडून खात्रीलायक माहिती मिळाली असती तर, वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर कर्मचा-यांना कामावर बोलवता आले असते. तब्बल दहा तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. पहिली पाळी तर गेलीच सोबत अनेक अनेक ऑर्डर लांबणीवर पडल्या.’

पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दीपक फल्ले म्हणाले, ‘सकाळपासून वीजपुरवठा नसल्याने पहिली पाळी कामाविना गेली. महापारेषण कडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने नियोजन करता आले नाही आणि कर्मचारी बसून राहिले. लघु, सूक्ष्म आणि मोठ्या उद्योगांना याचा फटका बसला आहे.’

दरम्यान, दाट धुकं आणि दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता आहे. दोन्ही महत्वाचे 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्यानं पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. असे महापारेषणकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.