Pimpri News: ‘स्थायी’ सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, 18 फेब्रुवारीच्या सभेत होणार नवीन नियुक्ती

अध्यक्षांसह 'या' आठ सदस्यांची संपणार मुदत  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती 18 फेब्रुवारीच्या महासभेत केली जाणार आहे. त्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या एका सदस्यांचा समावेश आहे. या पंचवार्षिकमधील हे शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणा-यांचा महापालिका कारभारात बोलबाला असतो. पालिकेचा कारभार ही समिती हाकत असते. स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सदस्य आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि भाजप संलग्न अपक्ष आघाडीच्या झामाबाई बारणे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपणार आहे. सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार 18 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्थायीत जाण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये चूरस निर्माण झाली आहे.

पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष, स्थायीत जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी!

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला ख-या अर्थाने आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षी तरी स्थायीत संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीत सदस्य निवडताना गटा-तटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पुरुष सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे कोणत्या पुरुष नगरसेवकांना संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच शिवसेना आणि अपक्ष आघाडीही कोणाला स्थायी समितीत पाठवते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.