Bhandara Dongar : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाच्या कामाने घेतली गती; वारकऱ्यांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

एमपीसी न्यूज : जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची (Bhandara Dongar) चिंतन भूमी असणा-या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशा एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणा-या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. आजपर्यंत मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले असून या दोन वर्षांच्या कालावधीत मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या मंदिरासाठी स्थापत्य विशारद ज्यांनी आयोध्यातील श्री रामचंद्रांचे मंदिर साकारले असे चंद्रकांत सोमपूरा, निखील सोमपुरा व बापू मनशंकर सोमपुरा या बंधूनी मेहनत घेतली आहे. तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे.

गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. मंदिराचे बांधकाम हे 25 हजार स्क्वेअर फुट जागेत होत आहे. मंदिराची लांबी 179 फूट व उंची 87 फूट, तर रुंदी 193 फूट आहे. मंदिराला तीन भव्य कळस असतील. मंदिराचा कळस सुमारे 96 फूट ते 87 फूट एवढ्या मोठ्या आकाराचा असेल.

या ठिकाणी एकाच वेळी अनेक भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. तर, मंदिराला छोटे 17 कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट हा 34 फूट बाय 34 फूट या आकाराचा असेल. त्यामुळे मंडपाची शोभा वाढणार आहे. मंदिरात पाच गर्भगृह असणार असून 13.5 फूट बाय 13.5 फूट आकाराचे असतील. गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील. मंदिराला एकूण 9 दरवाजे असतील. मंदिराचे फाउंडेशन जवळपास नऊ फुटाहून अधिक घेण्यात आले आहे.

मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची चार फूट उंचीची मूर्ती ही समोरच्या बाजूला बसविण्यात येणार आहे. मंदिरात भक्तांसाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. मंदिराच्या मंडपावर व भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असेल.

मंदिराच्या छतावर देखील नक्षीकाम पहावयास मिळणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोणाकृती असतील, त्यावर वैष्णवांच्या तब्बल 2200 मूर्तींचे कोरीव काम केलेले असेल. मंदिराच्या समोर उजवीकडे व डावीकडे शृंगार चौक असतील.

त्याचप्रमाणे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य – दिव्य शिल्प साकारले जाणार आहे. भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करत आहेत अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद व मंदिराच्या बांधकामाचे पूर्णपणे नियोजन पाहणारे गजाननबापू शेलार यांनी दिली.

काकडा आरती, अभिषेक, महापूजा व हरिपाठ झाल्यानंतर गाथामूर्ती हभप नानामहाराज तावरे यांच्या सुमधूर वाणीतून गाथा पारायण झाले. सायंकाळी हभप, आचार्य रविदासमहाराज शिरसाट यांनी कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर तत्वचिंतन पर निरूपण केले. ज्ञानेश्वरी ग्रंथातील मर्म सामान्य तर सोडाच बुद्धिवंताना देखील कळणे अवघड आहे. ज्ञानेश्वरीची कितीही पारायण झाली तरीही काही काही ओवींचा उलगडा होईलच असे सांगता येत नाही. मराठी भाषेला तत्वज्ञानाचा दर्जेदारपणा ज्ञानेश्वरीच्या रूपाने मिळाला, असे शिरसाट महाराज यांनी निरूपणातून सांगितले. रात्री 8 वाजता भागवताचार्य, हभप डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांची तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.